मार्च २०२३ - विचारकणिका
01/03/2023
श्रद्धेचा आधार सोडून दुराग्रह वाढवणे.
कोटी अश्वमेध करणे.
रत्ने भरून पृथ्वीचे दान देणे.
एका अंगठ्यावर उभे राहून हजार वर्षे तप करणे.
जलाशयाच्या नावे समुद्र नवे करणे.
खडकावर पडलेला पाऊस
भस्मात हवन
सावलीला आलिंगन
आकाशाला चापट
यासारखा व्यर्थ खटाटोप होय.
सम ओवी ज्ञानेश्वरी
—---------------------
0२/03/2023
कर्म सोडणे म्हणजे संन्यास! फक्त फळ सोडणे म्हणजे त्याग! नित्य नैमित्तिक कर्म हे स्वाभाविक. कामना धरून कर्म हे काम्य!
रानात झाडे अनेक असतात. पण भातशेती व उद्याने सहज होत नाहीत.
गवत न पेरता सर्वत्र उगवते पण साळीसाठी मशागत करावी लागते.
नदी आपोआप वाहते तर विहीर खणावी लागते.
—-----------------------------------
03/03/2023
संत
विश्व रागे झाले वन्हि
संत सुखे व्हावे पाणी
परशब्दे झाले क्लेश
संती मानावा उपदेश
त्याला म्हणू नये साधु
जगी विटंबना बहु
चिंता कोण मागे सारे
हात आपुला आपण धरे
जीभ दातांनी चावता
कोणी बत्तीशी पाडतो का?
उडत्याचे पाय खाली असतात हे लक्षात घ्यायला हवे.
—------------------
04/03/2023
उद्धवाने गोपींना कृष्णाचा नाद सोडा असे सांगितले तेव्हा गोपी उद्गारल्या,” अमृतफळ खायचे सोडून विषकीडा विषच खातो. भुंगा लाकडात घर करायचे सोडून कमल देठात करतो. मरण समोर दिसत असूनही पतंग दिव्यावर झेप घेतो. तशा आम्ही कृष्णात रंगलेल्या आहोत. त्याला सोडणार नाही.
—------------------------------------------
05/03/2023
सहिष्णुता
द्वंद्वसहिष्णुता- मानापमान, निंदा स्तुती वगैरे द्वंद्वापासून मुक्त होणे.
वेगसहिष्णुता- काम क्रोध इ, वेग उत्पन्न न होऊ देणे.
परमतसहिष्णुता- दुसऱ्याच्या मताचाही विचार करणे. त्यांच्या मताबद्दल संदेह न निर्माण होऊ देणे. उद्विग्नता न वाटण.
परोत्कर्ष सहिष्णुता- निर्मत्सर होणे.
या चारी सहिष्णुता बाळगणारा तपस्वी होय.
असहिष्णुता म्हणजे दुसऱ्याचा उत्कर्ष, स्तुती, वैभव सहन न होणे.
—-------------------------------
06/03/2023
भूतान
भारता्च्या उत्तर सीमेवरील निसर्गसंपन्न देश! पहिल्यांदा प्लॅस्टिकवर बंदी घालणाऱ्या देशांपैकी एक.
जगातला सर्वात जास्त जंगल परिसर येथे आहे.
आर्थिक दृष्ट्या गरीब पण सर्वात जास्त आनंदी देश.
जगातल्या दहा धोकादायक विमानतळांपैकी एक असलेले पारो विमानतळ येथलेच! कमी धावपट्टी असलेले एकमेव विमानतळ!
थिम्पूच्या राष्ट्रीय ग्रंथालयात जगातील सर्वात मोठे पुस्तक आहे.
१०८ स्तूप असलेला डोचूला पास आहे.
१३० पाऊंड वजन असलेला टाकिन हा प्राणी फक्त भूतान मध्येच आढळतो.
भूतान वीज निर्यात करणारा देश आहे.
डॉ. अनिल कुलकर्णी
—--------------------------
07/03/2023
समर्थ रामदासांच्या आरत्या
देवतेचे नेमके वर्णन
गणपती- वक्रतुंड, फणिवरबंधन, रुणझुणती नुपूरे व घागऱ्या
शंकर- कर्पूरगौर, नीलकंठ, मुनिजन सुखकारी,राममंत्र जपणारा
खंडोबा- बाशिंगे व पिवळा भंडारा
मारुती- चापल्य, वज्रांग, अचाट शक्ति
कृष्ण - वक्र उभे राहणे, यमुनतीरी खेळणे
पांडुरंग - भीमातीरवासी, जघनी कर ठेवलेले
आदिशक्ती- चरणतले महिषासुर घुंगुरडे मर्दिले
ज्ञानेश्वर - रेडा बोलविला, गीता देवी सकलांना सोपी केली,
अज्ञान अंधकार घालवला.
यातून त्यांनी सांगितलेल्या ‘नेमकेची बोलणे’ या गुणाचा आदर्श समोर येतो.
डॉ. ऊषा जोशी
—---------------------
08/03/2023
ताक पिण्याचे फायदे
लठ्ठपणा कमी होतो.
वारंवार लघवीला जावे लागत असले तर ताकात मीठ टाकून प्यावे.
तोंड आले असल्यास ताकाच्या गुळण्या कराव्या.
पोटातील जंतु ताकात ओवा टाकून प्यायल्यास कमी होतात.
लघवीची जळजळ ताकात गूळ टाकून प्यायल्यास कमी होते.
रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
ताकात साखर व काळी मिरपूड टाकून प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होतो.
असे आहे हे अमृततुल्य ताक!
श्री गजानन आशिष
—---------------------------------
09/03/2023
अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या ज्ञानेश्वरांची ध्यानमुद्रा आपली ज्ञानग्रहण लालसा वाढवते.
अभंग गाण्यात दंग असलेली तुकोबांची मुद्रा आठवून आपली भक्ती जागी होते.
प्रल्हादाची नृसिंह अवतारात प्रकटलेली मुद्रा दुर्जनांचा व वाईट विचारांचा नाश करण्याची प्रेरणा देते.
नवनाथांची प्रसन्न मुद्रा मर्यादित व त्यागी जीवनाचा संदेश देते.
विटेवरचा विठोबा ठामपणा शिकवतो.
गणपतीचे लोभस रूप, देवीचे प्रसन्न व शांत रुप या सर्व मुद्रा ज्ञान, भक्ती, निरागसता शिकवून नराचा नारायण घडवण्यात तत्पर असता.
—-------------------------------
10/03/2023
साईबाबांची काही वचने
तलवारीने झालेल्या जखमेपेक्षा जिभेने केली गेलेली जखम अधिक वेदनादायी असते.
धैर्यासमोर भयंकर संकटेही धुराच्या ढगाप्रमाणे उडून जातात.
खरे मित्र तीन - वृद्ध पत्नी, जुना कुत्रा, जवळ असलेले धन
मनुष्याचे तीन गुण- आशा विश्वास व दान
आळश्याला सर्व कामे कठीण वाटतात,कष्टाळूला सोपी वाटतात.
भूतकाळापासून प्रेरणा घेऊन वर्तमान काळात भविष्याची चिंता करावी.
आपल्या दोषांना झाकणारा डोळ्यांनी आंधळा असणाऱ्यापेक्षा अधिक आंधळा असतो.
परस्परात ऐक्य असलेले घर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच होय.
प्रेम हा दुसऱ्याला आपल्याकडे ओढणारा चुंबक होय.
—----------------------------------
11/03/2023
समर्थांचे काही विचार
मनाच्या शांतीसाठी, स्थिरतेसाठी भक्तिमार्ग धरला पाहिजे. गुरुचे मार्गदर्शन स्वीकारले पाहिजे. कुविद्येचा त्याग केला पाहिजे.
प्रपंच व परमार्थ यांच्या संयोगातही वैराग्य नांदू शकते.
प्रयत्नाशिवाय आत्मकल्याण, समाजकल्याण या गोष्टी अशक्य आहेत.
धीर असावा यशाचा! धिक्कार असावा आळसाचा.
आनंद असावा साफल्याचा.
आग्रह असावा भक्तीचा.
हुंकार असावा कर्तृत्वाचा.
कळवळा असावा सर्व प्राणी मात्राचा!
—--------------------
12/03/2023
मनुष्याचे तीन सद्गुण -आशा, विश्वास आणि दान
मनुष्याचे महत्व त्याच्या कपड्यांवर नाही तर त्याच्या आचरणावरून ठरते.
आळशी माणसाला सगळीच कामे अवघड वाटतात तर परिश्रम करणाऱ्याला सगळीच कामे सोपी वाटतात. दुसऱ्यांच्या सुखासाठी आपल्या सुखाचा त्याग केला पाहिजे.
जेव्हा तुम्ही कोणाची सेवा कराल तेव्हा त्याच्यातील त्रुटी बघून त्यांची घृणा न करता सेवा केली पाहिजे.
—-----------------------
13/03/2023
भूतकाळातून प्रेरणा घेऊन वर्तमानात भविष्याचा विचार केला पाहिजे.
जो आपले दोष झाकतो तो खरा आंधळा.
चिंता बळ,रूप, ज्ञान यांचा ऱ्हास करते.
दुसऱ्यांना पाडण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतः पडाल.
प्रेम हे इतरांना आपल्याकडे ओढणारा चुंबक आहे.
कुटुंबात मेळ असेल तर पृथ्वी स्वर्ग बनते.
—-------------------------
14/03/2023
तारूण्याचे तीन तकार - तेजस्विता, तपस्विता व तत्परता
आपल्या जीवनात एखादे लोकोपयोगी ध्येय जपतो तो तरूण. ते ध्येय सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो तो तरूण! ध्येय सिद्धीसाठी रात्रंदिवस तत्पर राहतो तो तरूण.
दादा धर्माधिकारी
—----------------------
15/03/2023
अजूनही जिवंत आहे गांधी- कवी अजय कांडर
जागतिक पातळीवर आज उभ्या असलेल्या किचकट राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक आर्थिक, कौटुंबिक, धार्मिक प्रश्नांवर गाधी विचारांनीच तोडगा निघेल असे कवीला वाटते. या देशातील माणूसपण पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा गांधी विचारांकडे जावे लागेल असे त्यांना वाटते.
या संग्रहाची पाठराखण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजी यांनी केली आहे.
—----------------------------
16/03/2023
गंमत शब्दांची
मिठी मारणे,आल्यागेल्याची विचारपूस, ये जा चालू असणे, गप्पा मारणे, शिव्या देणे. गप्पा काय दंडा आहे का मारायला? शिव्या काय लाडू आहेत?
तिथे ये जा चालू आहे- एकाच वेळी दोन्ही कसे करता येईल?
झाले गेले विसरून जा - गेले आहे मग विसरायचे काय?
—---------------------------------
17/03/2023
सत्वगुण
वासनेवर नियंत्रण
आलेल्या संकटांनी न डगमगणे
श्रवण मननाने समाधान होणे
अहंकार नाही
नैराश्य नाही
कृपा करणारा
सर्वांशी नम्र वागणारा
मर्यादा न सोडणारा
परोपकारी
परकार्यसिद्धीसाठी झटणारा
निंदकावरही उपकार करणारा
—---------------------------
18/03/2023
साधक
अवगुण सोडून सत्संगात राहणारा
श्रवणाची आवड असणारा
सारासार विचार ऐकणारा व करणारा
संदेह निवृत्तीसाठी सत्संगात राहणारा
आत्मज्ञान दृढ धरणारा
द्वैत सोडून एकतेची उपासना करणारा
जीर्ण आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करुन विवेक बाळगणारा
असत्क्रिया सोडून सत्क्रियेत दंग राहणारा
—------------------------------
19/03/2023
सद्गुरू वचन
वेदांताचा मतितार्थ परमार्थ! परमार्थापेक्षाही गहन सद्गुरूवचन! या वचनानेच सुविद्या प्राप्त होते.
सन्निपाताने भयानक गोष्टी दिसतात. औषध घेतले की बरे वाटते तसे अज्ञान संन्निपाताला ज्ञानौषध नाहीसे करते.
अविद्याझोप श्रवणमननाने नाहीशी करावी. जागृतीची ओळख म्हणजे विषयविरक्ती!
—---------------------------
20/03/2023
महिला व रक्षकदल
१९९०च्या सुरवातीला सैन्यदलामध्ये महिलांची अधिकारी म्हणून भरती सुरू झाली.
सध्या लष्कर, हवाई दल आणि नौदल या सर्व खात्यात महिला अधिकारी कार्यरत आहेत.
सध्या हवाईदलात १८ महिला वैमानिक मिग २१, मिग २९, सुखोई व राफेल या विमानांचे सारथ्य करत आहेत.
नौदलात ३० महिला अधिकारी मोक्याच्या युद्ध नौकांवर कार्यरत आहेत.
आता सीमावर्ती भागामध्ये ही युनिट प्रमुख म्हणून महिला कार्यरत आहेत.
—-------------------------------
21/03/2023
आज पाकिस्तानातील डॉक्टर महिलांची स्थिती पाहू.
सत्तर टक्के महिला डॉक्टरना लिंगभेदाला सामोरे जावे लागते. सहा टक्के महिला डॉक्टरना वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळतच नाही. संधी मिळालेल्यांना ही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. रोगग्रस्त महिला पुरुष डॉक्टरकडे उपचारासाठी जाऊ शकत नाहीत. रुग्णालयात महिला डॉक्टरना काहीच सोयी सुविधा उपलब्ध नसतात.
योगिता साळवी
—------------------------------
22/03/2023
पानगळ संपून वृक्षाना आता नवी पालवी फुटायला लागणार! निसर्गाच्या या नवनिर्माण कार्याबरोबरच भारतीय कालगणनेचे नव शोभन नाम संवत्सर आज सुरू होत आहे.
सुख, शांति, समाधान, संपन्नता सर्वांना प्राप्त होवो अशी देवाला प्रार्थना.
सुशील
—---------------------
23/03/2023
शतकोटी प्रविस्तरम् अशा रामचरित्राची वाटणी देव,दानव,मानव यांच्यात करायचे ठरले. निस्पृह अशा शंकराकडे हे काम सोपवले गेले.
सर्वांना समप्रमाणात वाटणी झाल्यावर उरलेले शेष शंकरांनी स्विकारावे असेही सर्वमान्य झाले.
शतकोटी श्लोकातील तेहतीस कोटी, तेहतीस लक्ष, तेहतीस हजार श्लोक वाटले गेले.
उरला एक श्लोक! अनुष्टुप छंदातील असल्याने बत्तीस अक्षरे होती. प्रत्येकाला दहा दहा देऊन उरली दोन अक्षरे! ती शंकरांना मिळाली ती होती' राम'
अन् शंकर रामनामाच्या ब्रम्हानंदात दंग झाल.
—---------------------------------
24/03/2023
जांबवदाश्रय:
सीताशोधासाठी सागर ओलांडून लंकेत जायचे होते. एका ऊडीत दक्षिण सागर ओलांडून लंकेत पोचायचे होते. एवढी ऊंच व लांब ऊडी फक्त हनुमानच मारु शकत होता. पण हे तो विसरला होता.
नारायणाची नाभी आश्रयस्थान असलेल्या ब्रम्हपुत्र जांबवताने हनुमंताची कुंडलिनी शक्ती जागृत केली व हनुमंताने उडी मारुन लंका गाठून सीतेचा शोध लावला म्हणून नाभिं पातु जांबवतश्रय!
—------------------------------------
25/03/2023
घ्राणं पातु मखत्राता
मख म्हणजे यज्ञ! विश्वामित्रांनी रामचंद्रांना बरोबर नेऊन शिक्षण दिल्यावर रामांनी ऋषींच्या यज्ञांचे व आश्रमांचे राक्षसांपासून रक्षण केले म्हणून मखत्राता!
यज्ञातील हविर्भुत द्रव्यांमुळे निर्माण होणाऱ्या अग्निज्वाला व धूम यांनी वायुमंडल शूद्ध होते. अशा वायुमंडलात श्वासोच्छवास केल्यास मानवी जीवन निरामय व आरोग्य संपन्न होते. श्वासोच्छवासाचे काम नाक करते. म्हणून घ्राणं पातु मखत्राता!
—------------------------------------------
26/03/2023
दक्षिणे लक्ष्मणं यस्य!
लक्ष्मण म्हणजे सुचिन्हयुक्त, सुलक्षणी, सुदैवी
दक्षिणचा अर्थ अनुकुल असाही होतो.
सुलक्षणी व दिव्य अशा रामाला वंदन.
वामे तु जनकात्मजा
वाम याचा अर्थ अतिसुंदर मनोहर असाही आहे. अवर्णनीय सौंदर्यशाली आदिशक्ती ज्याच्यात समाविष्ट आहे असा.
दास्यभक्तीचा प्रतिक असलेला मारुती ज्याच्यापुढे हात जोडून उभा आहे अश्या रघुनंदनाला नमस्कार.
श्री.रघुनाथ शंकर घाटे
—---------------------------
27/03/2023
श्रीमान राम
श्री म्हणजे लक्ष्मी. श्रीमान म्हणजे विष्णू. विष्णुचा अवतार राम.
श्री म्हणजे शोभा, कांति, सौंदर्य यांनी युक्त राम
श्री म्हणजे कीर्ती.. पूर्वजांची कीर्ती वृद्धिंगत करणारा राम
श्री म्हणजे सरस्वती! ज्याला सरस्वती वश आहे असा राम!
श्री म्हणजे सद्गुण! जो सद्गुणांचा जणू पुतळाच आहे असा राम!
श्री म्हणजे प्रज्ञा, बुद्धी यांनी युक्त राम
श्री म्हणजे सद्गुण
श्री म्हणजे दैवी शक्ती
श्री म्हणजे वेदत्रयी
या सर्व गुणांचा पुतळा असलेला राम
अशा या सद्गुणांचा पुतळा असलेल्या रामाला
नमस्कार.
—---------------------------
28/03/2023
शूर्पणखेचा भाऊ खर चौदा हजार सेना घेऊन पंचवटी कडे निघाला.
रामपक्ष सावध होताच. वनवासींनी खराला थोपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.
खराला अनेक अपशकुन झाले असे वर्णन आहे. त्यावरून असे दिसते की वनवासींनी खराला रोखण्यासाठी अनेक तंत्रे अवलंबिली होती.
राक्षसांच्या डोळ्याची चुरचुर झाली याचा अर्थ अश्रुधुराचा वापर झाला असावा.
वनवासींनी रस्त्यावर चिकट पदार्थ टाकून खरसैन्याची फजिती केली असावी. महाभयंकर आवाज करून शत्रूला भिववण्याचा प्रयत्न केला असावा.
सामान्य जनतेला प्रतिकाराचे हे प्रशिक्षण विचार करण्याजोगे आहे.
ललिता रामचंद्र
—------------------------------
29/03/2023
रामबंधू पण फारसा प्रसिद्ध नसलेला शत्रुघ्न! नावातच शत्रूंना मारणारा असा अर्थ आहे.
लवणासुराला मारणे अत्यावश्यक झाले होते. शत्रुघ्नाने ते काम करावयाचे ठरवले. त्याची माहिती मिळवली.
लवणासुर भक्ष्य मिळवण्यासाठी वनात गेला. तो परतण्याआधीच शत्रुघ्नाने त्याच्या नगराचे प्रवेशद्वार अडवले. तो परतल्यानंतर घनघोर युद्ध झाले.
शत्रुघ्नाने आकर्ण धनुष्य ताणून एक दिव्य बाण त्याच्यावर सोडला. लवणासुराच्या वक्षस्थळाला भेदून तो पाताळात गेला व परत शत्रुघ्नाच्या भात्यात आला.
असे युद्धकौशल्य असलेल्या शत्रुघ्नाने आपले नाव सार्थ केले.
—------------------------
30/03/2023
आज रामनवमी. श्री.रामरायाला वंदन करून त्याने केलेले महान कार्य जाणून घेऊ या.
उत्तर भारत- सपाट, सुपीक, गंगा यमुना सारख्या नद्यांमुळे भारतीय मुख्य व्यवसाय शेती समृद्ध झालेला प्रदेश! ऊत्तरेला हिमालय व दक्षिणेस विंध्य पर्वत यामुळे परचक्रापासून बरेचसे संरक्षण मिळालेले! त्यामुळे समृद्ध व सुरक्षित झाल्याने येथील मानवी जीवन ही स्वस्थ व समृद्ध व भरभराट झालेले! स्वाभाविकच ज्ञान, विज्ञान, उद्योग, विविध शास्त्रे यात प्रगत झालेले!
दक्षिण भारत- पठारी प्रदेश! शेतीखालील जमीन कमी! मुळातच निमुळता असल्याने नद्यांचे प्रवाह लहान! मानवी जीवन फारसे प्रगत झालेले नाही. लंकेतील राक्षसांच्या हल्यांमुळे असुरक्षित!
ऊत्तर भारत- अधिकाधिक प्रगत होत चाललेला तर दक्षिण भारत अधिकाधिक खालावत चाललेला! याचे पुराणात वर्णन आहे " विंध्य पर्वताची उंची वाढत आहे"
—----------------------
31/03/2023
काही वैशिष्ट्ये
माणसाचा मोठेपणा त्याच्या वागणुकीतून लक्षात येतो. कपड्यांवरुन ठरत नाही.
मनुष्याचे तीन गुण- आशा, विश्वास व दान
आळश्याला सगळी कामे अवघड वाटतात तर परिश्रम करणाराला सोपी.
दुसऱ्यातील उणीवा लक्षात घेऊन बुद्धिवान स्वतः ला सुधारतो. कुटुंबात सामंजस्य म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग.
प्रभाकर वडीखाये
—-----------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा